नवी दिल्ली: बिग बॉस ओटीटी- 2 चा विजेता आणि प्रसिद्ध युट्युबर एल्विश यादव याची वाद काय पाठ सोडत नाही. एल्विश यादवविरुद्धचा एक खटला संपत नाही, तोच दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. आता ईडी आता एल्विश यादववर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ईडी लवकरच एल्विश यादवची चौकशी करणार आहे. त्याच्या मालकीच्या महागड्या कारच्या ताफ्याचीही चौकशी केली जाऊ शकते.
मनी लाँड्रिंग प्रकरणी एल्विश यादववर गुन्हा दाखल
नोएडात नोव्हेंबरमध्ये सापाच्या विषाप्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडी एल्विश यादव आणि इतरांची चौकशी करणार आहे. एल्विश यादवला चौकशीसाठी ईडीच्या लखनऊ झोन कार्यालयात बोलावले जाऊ शकते. अहवालानुसार, ईडी (अंमलबजावणी संचालनालय) च्या लखनऊ युनिटने पीएमएलए अंतर्गत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आता ईडी एल्विश यादवला सापाचे विष विकून मिळालेल्या पैशांबाबत समन्स पाठवण्याच्या तयारीत आहे.
रिपोर्टनुसार, एल्विश यादवशिवाय ईडी सापाच्या विष प्रकरणाशी संबंधित इतर लोकांचीही चौकशी करणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी एल्विश यादवसह ६ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्यानंतर 17 मार्च 2024 रोजी एल्विश यादव आणि इतरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली होती. सध्या एल्विश यादव जामिनावर बाहेर आहे.