नवी दिल्ली : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार देव कोहली यांचे शनिवारी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोहली यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘हम आपके है कौन’, ‘जुडवा 2’, ‘मुसाफिर’, ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ आणि ‘टॅक्सी नंबर 9211’ यासह 100 हून अधिक चित्रपटांसाठी गीते लिहिली.
देव कोहली यांचे त्यांच्या राहत्या घरी शनिवारी सकाळी निधन झाले. ते काही महिन्यांपासून आजारी होते आणि 10 दिवसांपूर्वी घरी आणण्यापूर्वी त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे देव कोहली यांचे निकटवर्तीय प्रीतम शर्मा यांनी सांगितले. देव कोहली यांनी अनु मलिक, राम लक्ष्मण, आनंद राज आनंद, आनंद मिलिंद या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले होते.
दरम्यान, देव कोहली यांचे पार्थिव मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील ज्युपिटर अपार्टमेंटमध्ये दुपारी दोन वाजता अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती दिली जात आहे.
पाकिस्तानातील रावळपिंडी येथे जन्म
देव कोहली यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1942 रोजी पाकिस्तानातील रावळपिंडी शहरातील शीख कुटुंबात झाला. 1949 मध्ये ते दिल्लीला गेले आणि त्यांचे बालपण डेहराडूनमध्ये गेले. 1964 मध्ये मुंबईत आल्यावर कोहली यांनी चित्रपटात काम शोधायला सुरुवात केली. 1969 मध्ये ‘गुंडा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी इंडस्ट्रीत प्रवेश केला. 1971 मध्ये आलेल्या ‘लाल पत्थर’ चित्रपटातील ‘गीत गाता हूं मैं’ या गाण्याने त्यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला.
90 च्या दशकात दिली अनेक हिट गाणी
‘आते जाते हंस्ते गाते’, ‘कबूतर जा जा’, ‘आजा शाम होने आयी’, ‘मैंने प्यार किया’ आणि ‘हम आपके है कौन’ यांसारख्या अनेक हिट गाण्यांचे बोल त्यांनी लिहिले. त्यांनी आणि अनु मलिक यांनी 1990 च्या दशकात ‘इश्क’ चित्रपटासाठी ‘देखो देखो जानम हम’ आणि ‘बाजीगर’साठी ‘ये काली काली आंखे’सारखी गाणी रचली.