विशाल कदम
लोणी काळभोर, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील सायरस पूनावाला या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे कार्यालयीन व्यवस्थापक प्रा. दर्शनकुमार बोबडे यांचे गाणे ‘I प्रेम U’ या मराठी चित्रपटात घेण्यात आले आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना भरपूर आवडला असून हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उस्तुकता आहे.
दर्शनकुमार बोबडे यांचे मूळगाव कुळधरण (ता. कर्जत. जि. अहमदनगर) आहे. त्यांनी भिगवण, इंदापूर, पुणे आणि उरुळी कांचन येथे अध्यापनाचे कार्य केले आहे. मागील ५ वर्षापासून उरुळी कांचन येथील सायरस पूनावाला या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कार्यालयीन व्यवस्थापक प्रमुख म्हणून काम करीत आहेत.
बोबडे यांनी ‘I प्रेम U’ या मराठी चित्रपटात चार गाणे लिहिले आहेत. या मराठी चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. याअगोदर बोबडे सरांनी धुंद-मधुमती चित्रपटात गीत लेखन केले आहे. तसेच दमयंती चित्रपटाची कथा व पटकथा लिहिली आहे. त्यांमुळे बोबडे सर आता उत्कृष्ट शिक्षक ते नवोदित गीतकार अशी योग्य वाटचाल करीत आहेत.
तर जाणून घेऊया ‘I प्रेम U’ चित्रपटाची थोडक्यात माहिती….
दाक्षिणात्य अभिनेत्री कायदू लोहार या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. कायदू आणि अभिजित अमकर ही फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा रोमँटिक टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. “I प्रेम U” यामधील प्रेम म्हणजे काय? याची गोष्ट या रोमँटिक चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आसाममधील तेजपूर येथे जन्म झालेल्या कायदू लोहारने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मुगीलपेटे, पोथानपाथम नूट्टांडू, अलुरी असे कन्नड, मल्याळममधील चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यानंतर आता ती मराठीत पाऊल टाकत आहे. तिच्याबरोबर एक सांगायचंय, टकाटक अशा चित्रपटांतील अभिनयाचं कौतुक झालेला अभिनेता अभिजित अमकर या चित्रपटात दिसणार आहे.
दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती साईश्री एंटरटेन्मेंटच्या मधुकर गुर्सल, नितीन कहार यांनी केली आहे. नितीन कहार यांनीच लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. अविनाश सातोसकर यांनी छायांकन, संजू-संग्राम आणि यशोधन कदम यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. तर येत्या १७ मार्चला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.