पुणे प्राईम न्यूज डेस्क: या रविवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या कॉमेडी शो मध्ये हास्य-विनोदात रंगून जाण्यासाठी तयार रहा, कारण टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबी, सुरभी चंदना आणि अदा खान यांच्या उपस्थितीत ‘डेली सोप क्वीन्स’ हा विशेष भाग साजरा होणार आहे.
विनोदवीर केतन सिंह, कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी मिळून ‘देवदास’ या क्लासिक चित्रपटाचे विडंबन सादर करणार आहेत. यामध्ये केतन देव बाबूच्या, कुशल चुन्नी बाबूच्या तर हेमांगी पारोच्या रूपात दिसेल. या स्पूफमध्ये देव बाबूचा ब्रेकअप झाल्यामुळे निराश झालेला चुन्नी बाबू दिसेल. या परिस्थितीत चुन्नी बाबू हा देव बाबूच्या दुःखाचा फायदा घेऊन दुकान बळकावण्याचा खटाटोप करताना दिसेल. पण देव बाबूची एक्स-गर्लफ्रेंड पारो मध्ये-मध्ये लुडबूड करत असल्याने गोंधळ निर्माण होतो. एकामागून एक अनेक विनोदी प्रसंग घडतात आणि अखेरीस चुन्नी बाबू आणि देव बाबू दोघेही आर्थिक अडचणीत सापडतात.
हा गॅग खूपच मनोरंजक असणार आहे. त्यात पारोची भूमिका करण्याचा अनुभव सांगताना हेमांगी कवी म्हणते, “मी संजय लीला भन्साळींची आणि ‘देवदास’मध्ये त्यांनी उभ्या केलेल्या ‘पारो’ या व्यक्तिरेखेची मोठी फॅन आहे. माझ्या कारकिर्दीत पारोची भूमिका करण्याची माझी पहिल्यापासून इच्छा होती. ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’च्या मदतीने माझी ती इच्छा पूर्ण होत आहे. लोकांना पारो या विलक्षण व्यक्तिरेखेचे एक नवीन विनोदी रूप बघायला मिळेल. कॉस्च्युम टीम विशेष अभिनंदनास पात्र आहे, कारण पारोच्या पोशाखातून त्यांनी तिची व्यक्तिरेखा उत्तम टिपली आहे. आणि अर्थात कुशल बद्रिके आणि केतन सिंह या दोन अद्भुत कलाकारांसोबत काम करताना फारच मजा येते, कारण पडद्याच्या मागच्या आमच्या मैत्रीचे प्रतिबिंब पडद्यावरच्या आमच्या अभिनयातून दिसते. मला आशा आहे की, आम्हाला हा अॅक्ट करताना जितकी मजा आली, तितकीच मजा प्रेक्षकांना अॅक्ट बघताना देखील येईल!”