बरेली: टीव्ही मालिकांमधील अभिनेत्री सपना सिंह यांच्या १४ वर्षीय मृलाचा उत्तर प्रदेशच्या बरेलीत संशयास्पद मृत्यू झाला. या मुलाच्या दोन मित्रांनी त्याला कथितरीत्या अमली पदार्थ खाऊ घातले होते. त्यानंतर मुलाचा मृत्यू झाल्याने ही हत्या असल्याची दाट शक्यता आहे. मुलाच्या मृत्यूनंतर सपना यांनी दीड तास आंदोलन केल्यानंतर अखेर पोलिसांनी नव्याने गुन्हा दाखल करीत मंगळवारी या दोन मित्रांना अटक केली.
इयत्ता आठवीत शिकणारा सागर गंगवार त्याच्या मामासोबत बरेलीतील आनंद विहार कॉलनीत राहत होता. शनिवारी शाळेत गेल्यानंतर सागर घरी परतलाच नाही. म्हणून त्याच्या नातलगांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दरम्यान, रविवारी सकाळी त्याचा मृतदेह अदलखिया गावाजवळ आढळून आला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती. त्यामुळे अज्ञात म्हणूनच त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यातून मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, विष किंवा अमली पदार्थाच्या अतिसेवनाने मृत्यू झाल्याचे संकेत मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी सागरच्या नातलगांमुळे मृतदेहाची ओळख पटली.
दोन मित्रांच्या चौकशीतून अमली पदार्थ व दारूचे सेवन केल्याची कबुली दिली. यावेळी सागर बेशुद्ध झाल्यानंतर आम्ही घाबरून जात त्याला ओढत नेऊन एका शेतात सोडून दिल्याचे दोघांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजमध्येही दोन्ही मित्र सागरला बेशुद्धावस्थेत ओढत शेतात नेत असल्याचे दिसून आले. सपना सिंह यांनी क्राईम पेट्रोल, माटी की बन्नो या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. मुंबईहून परतल्यानंतर मुलाचा मृत्यू पाहून त्यांनी हंबरडा फोडत न्यायाची मागणी केली. यादरम्यान, पुन्हा शवविच्छेदनाची मागणी करीत सागरच्या गावातील लोकांनी रास्ता रोको आंदोलन केले.