मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत सादर केल्यानंतर स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा वादात सापडला आहे. दरम्यान, कुणाल कामरा याची विनंती मुंबई पोलिसांनी फेटाळली आहे. कामरा याने अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला होता. पण मुंबई पोलिसांनी त्याची विनंती फेटाळली आहे. पोलीस त्याला आता भारतीय न्याय संहिता कलम ३५ अंतर्गत दुसरे समन्स जारी करणार आहेत.
खार पोलिसांनी कामराला समन्स बजावले होते. ज्यावर त्याने एका आठवड्याचा वेळ मागितला होता. त्याच्या वकिलाने खार पोलीस स्थानक गाठले आणि कुणालच्या जबाबाची हार्ड कॉपी खार पोलिसांना देत आठवडाभराची मुदत मागितली होती. खार पोलिसांनी त्याची ही विनंती फेटाळली. त्याला मंगळवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते.