मुंबई : अभिनेत्री राखी सावंत यांची आई जया सावंत यांचे शनिवारी (ता.२८) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईत निधन झाले आहे.
जया सावंत या मागील बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना कॅन्सर आणि ब्रेन ट्युमर होता. त्यांच्यावर जुहू येथील सिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या महिन्याच्या सुरुवातीलाच राखी सावंतने तिच्या आईला ब्रेन ट्यूमर असल्याचा खुलासा केला होता. त्यासाठीच ती बिग बॉस मराठीच्या घरातून लवकर बाहेर पडली होती. आईच्या अखेरच्या क्षणांमध्ये राखी आईसोबतच होती.
आईच्या निधनाने राखी पूर्णपणे तुटली आहे. जेव्हापासून राखीला समज आली तिने एकटीने संपूर्ण घर सांभाळलं. तसेच राखीच्या प्रवासात तिच्या आईने शेवटपर्यंत तिला साथ दिली. राखीनेही आपल्या आईची साथ कधीही सोडली नाही.
दरम्यान, राखीच्या आईचे पार्थिव जुहू येथील क्रिटिकेअरमधून कूपर रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.