मुंबई: जगातील सर्वात प्रसिद्ध टीव्ही शो ‘सीआयडी’ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये सोनी टीव्हीने शिवाजी साटम यांचा हा क्राईम शो बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याआधी २० वर्षे सीआयडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या शोच्या माध्यमातून इंडस्ट्रीला अनेक प्रतिभावान कलाकार मिळाले. सीआयडी बंद झाल्यानंतर गेल्या 6 वर्षांपासून हा शो परत आणण्याची मागणी होत आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, आता निर्मात्यांनी पुन्हा एकदा या शोच्या पुनरागमनावर काम सुरू केले आहे. मात्र, हे सर्व सध्या प्राथमिक अवस्थेत आहे आणि त्यामुळेच या शोबाबत वाहिनीकडून अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बीपी सिंग यांच्या ‘फायरवर्क्स प्रॉडक्शन’ने अलीकडेच सीआयडी टीमसोबत सामंजस्य करार केला आहे. एमओयू हा दोन पक्षांमध्ये केलेला करार आहे, ज्यामध्ये दोन पक्षांमधील कार्यक्रमाची प्रारंभिक रूपरेषा ठरवली जाते. मात्र, सीआयडीचा नवा शो करण्यासाठी उचललेले हे पहिले पाऊल असून प्रॉडक्शनने कलाकारांना सोबत घेऊन अन्य तयारी सुरू केली आहे.
चॅनलची मंजूरी देखील आवश्यक
आता निर्मात्यांना सीआयडीच्या नव्या कथेवर काम करावे लागणार आहे. स्क्रिप्ट आणि संकल्पनेवर काम केल्यानंतर, जेव्हा ते पायलट एपिसोड शूट करतील आणि चॅनलला पाठवतील, तेव्हा चॅनलद्वारे तो मंजूर किंवा नाकारला जाईल. जर पायलट भाग मंजूर झाला तरच या शोचा नवीन सीझन लाँच केला जाईल. हा शो सुरू झाल्यास कलाकारांसोबतच सीआयडीच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असेल.
फ्रेडीशिवाय सीआयडी
सीआयडी सोनी टीव्हीवर परतणार आहे. पण या गंभीर शोमध्ये कॉमेडीचा टच जोडणारा फ्रेडी आता या शोमध्ये दिसणार नाही. गेल्या वर्षी फ्रेडीची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शोमध्ये त्यांच्या पात्राच्या जागी नवीन पात्राचा समावेश केला जाऊ शकतो.