मुंबई : लोकसभा खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत हिची मुख्य भूमिका असलेल्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा मुहूर्त सेन्सॉर सर्टिफिकेट न मिळाल्याने पुन्हा लांबणीवर पडला आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासंबंधित पाठवलेल्या प्रस्तावावर सेन्सॉर बोर्डाच्या आढावा समितीने निर्णय न घेतल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला व न्यायमूर्ती फिरदोस पुनीवाला यांच्या खंडपीठाने २५ सप्टेंबरपूर्वी निर्णय घ्या, असे निर्देश देत याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.
‘इमर्जन्सी’ चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे प्रदर्शन खोळंबले आहे. प्रमाणपत्र देण्यासाठी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाला (सीबीएफसी) निर्देश द्या, अशी मागणी करत सह निर्मात्या झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला व न्यायमूर्ती फिरदोस पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी झीच्या वतीने ज्येष्ठ वकील अॅड. व्यंकटेश धोंड यांनी हरियाणामध्ये ऑक्टोबर महिन्यांत निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकीच्या तोंडावर चित्रपटामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावून मतांवर परिणाम होईल, या शक्यतेने चित्रपटाला प्रमाणपत्र दिले जात नाही. सेन्सॉर बोर्ड केंद्रातील भाजप सरकारच्या सांगण्यावरून प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई करत आहे, असा आरोप केला.
तर सीबीएफसीतर्फे अॅड. अभिनव चंद्रचूड यांनी चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासंबंधित प्रस्ताव सेन्सॉर बोर्डाच्या आढावा समितीकडे पाठवला आहे. समितीकडून अंतिम निर्णय अद्याप घेतला नसल्याने दोन आठवड्यांचा वेळ मागितला. याची खंडपीठाने गंभीर दखल घेत याचिकाकर्त्यांचा आणि सेन्सॉर बोर्डाचा चांगलाच समाचार घेतला. आम्हाला तुमच्या राजकारणाशी काही देणे-घेणे नाही. आम्हाला त्यात पडायचेही नाही, असे स्पष्ट करताना खंडपीठाने सेन्सॉर बोर्डाला एक आठवड्याचा वेळ देताना २५ सप्टेंबरपूर्वी निर्णय घ्या, असे आदेश दिले.