पुणे : छोट्या पडद्यावर कायम चर्चेत असलेला ‘बिग बॉस मराठी’ या रिॲलिटी शोची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. यंदा ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व असणार आहे. आतापर्यंत बिग बॉस मराठीचे चारही पर्व अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते. पण यंदा त्यांची जागा अभिनेता रितेश देशमुख घेताना दिसणार आहे. हे पाहून बिग बॉसमधील स्पर्धक अपूर्वा नेमळेकरने कमेंट केली आहे. तिच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता रितेश देशमुख हा कार्यक्रम होस्ट करणार असल्याने चाहत्यांमध्ये बिग बॉस मराठीच्या या सीझनबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
यावेळी काय म्हणाली अपूर्वा नेमळेकर?
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनमध्ये अपूर्वा नेमळेकर ही टॉप स्पर्धकांमध्ये होती. अगदीच थोडक्यात तिच्या हातून विजेती होण्याची संधी निसटली. त्या वेळी अपूर्वाने सौंदर्य आणि खेळातील डाव पेच दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली होती. अपूर्वासोबत इतर स्पर्धकांचे झालेले वादही गाजले गेले. आता अपूर्वाने बिग बॉस मराठीच्या नव्या होस्ट बाबत कमेंट करताना इन्स्टाग्रामवर स्टोरीतून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रोमो शेअर करण्यात आला. त्यामध्ये रितेश देशमुख होस्ट असल्याचे पाहायला मिळाले. या प्रोमोवर तिने ‘फायनली… इसको बोलते है होस्ट…. रितेश सर वेलकम…’ असे म्हटले आहे.
यंदाच्या सिझनमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. काही स्पर्धकांची नावं चर्चेत आहेत. बिग बॉसच्या नव्या सिझनमध्ये नवा ड्रामा पहायला मिळणार हे नक्की. त्याचसोबत बिग बॉसचं नवीन घर कसं असेल, शोची नवीन संकल्पना कशी असेल, नवे खेळ कोणते असतील, याचीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
यावेळी काहींनी रितेशच्या या नव्या भूमिकेविषयी उत्सुकता व्यक्त केली. तर काहींनी महेश मांजरेकर नसल्याने नाराजी व्यक्त केली.