Ustad Zakir Hussain : जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांच्या मृत्यूच्या बातम्या प्रसारित होत असतानाच त्यांच्या बहिणीकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. झाकिर हुसैन यांची तब्येत खालावली असून गेल्या काही वर्षांपासून हृदयाशी संबंधित आजाराशी ते झुंज देत आहेत. अमेरिकेतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती त्यांची बहीण खुर्शीद यांनी दिली आहे. त्यांचा मृत्यू झालेला नसून ते अजूनही हयात आहेत, अशी माहितीदेखील त्यांनी दिली आहे.
अमेरिकेतील रुग्णालयात झाकीर हुसैन यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. अशातच या सर्व अफवा असून ते अजुन हयात आहेत. तसेच अमेरिकेतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांच्या बहिणीकडून देण्यात आली आहे.
खुर्शीद औलिया यांनी भाऊ झाकीर हुसैन यांच्या मृत्यूचं वृत्त चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. खुर्शीद म्हणाल्या की, त्यांची मुलगी सध्या सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात आहे आणि काही काळापूर्वी त्यांच्या मुलीनं झाकीर हुसैन अजूनही हयात असल्याचं सांगितलं आहे.
उस्ताद झाकीर हुसैन यांची बहीण खुर्शीद पुढे म्हणाल्या की, “त्यांची प्रकृती चिंताजनक असली, तरी ते हयात आहेत. त्यांच्या मृत्यूची बातमी पसरवणारे कोणाच्या वतीनं त्यांच्या मृत्यूची पुष्टी करत आहेत? आणि ते असं का करत आहेत?” तसेच, कुटुंबीयांनी तरी अद्याप असं कोणतंही वक्तव्य जारी केलेलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
उस्ताद झाकीर हुसैन यांच्याविषयी..
जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन प्रसिद्ध तबलावादक अल्ला रखा खाँ यांचे पुत्र आहेत. जाकिर हुसैन यांनी वयाच्या सातव्या वर्षी तबल्यावर पहिली थाप मारली आणि तिथूनच त्यांच्या प्रशिक्षणाची सुरुवात झाली. त्यानंतर वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी देशभरात आपली कला सादर करण्यास सुरुवात केली. झाकीर हुसैन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते.