पाटणा: लोकप्रिय भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह हिला निनावी फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वेगवेगळ्या क्रमांकावरून तिच्याकडे ५० लाखांची खंडणी मागण्यात आली आहे. जर एवढी रक्कम दिली नाही, तर दोन दिवसांत ठार मारण्यात येईल, असे अज्ञातांनी तिला धमकावले आहे. याबाबत अक्षराने दानापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
अल्पावधीतच भोजपुरी चित्रपटांमध्ये लोकप्रिय झालेल्या अक्षरा सिंह या अभिनेत्रीला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ११ नोव्हेंबरच्या भल्या पहाटे १२ वाजून २० मिनिटे व त्यानंतर १२ वाजून २१ मिनिटांच्या सुमारास तिला दोन फोन कॉल्स आले. आम्हाला ताबडतोब ५० लाख रुपयांची खंडणी देण्यात यावी, अन्यथा दोन दिवसांत तुला ठार मारले जाईल, अशी धमकी तिला फोनवरून देण्यात आली. फोनवरून तिला शिवीगाळसुद्धा करण्यात आली आहे. या धमकीनंतर अक्षरा सिंह हिने आपल्या जवळच्या व्यक्तीला पाठवून बिहारची राजधानी पाटणा स्थित दानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आपल्याला फोनवरून धमकावणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी तिने केली, अशी माहिती ठाण्याचे प्रभारी प्रशांत कुमार भारद्वाज यांनी दिली. अक्षरा सिंहच्या फिर्यादीवरून पुढील तपास केला जात आहे. तिला दूरध्वनीवरून धमकावणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. लवकरच त्यांच्या मुसक्या आवळण्यात येतील, असे भारद्वाज म्हणाले. विशेष बाब अशी की, भोजपुरी अभिनेते रवि किशन सोबत ‘सत्यमेव जयते’ मधून अक्षरा सिंह हिने भोजपुरी सिनेमात पदार्पण केले. ‘सत्या’, ‘तबादला’ आणि ‘माँ तुझे सलाम’ यांसारख्या चित्रपटांत तिने काम केले आहे. अभिनयासोबतच गायक म्हणूनही अक्षरा सिंह बिहारमध्ये लोकप्रिय आहे.