गुरुग्राम: अभी तो पार्टी शुरू हुई है, डीजे वाले बाबू यासारख्या हिंदी गाण्यांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला गायक रॅपर बादशाह याला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी १५ हजारांचा दंड ठोठावला. नियम सगळ्यांना सारखेच असतात, याचे आदर्श उदाहरण ठरणारी कामगिरी गुरुग्राम पोलिसांनी करून दाखविली आहे.
विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, गाडीत मोठ्या आवाजात गाणी लावणे आणि बेदरकार वाहन चालविल्याप्रकरणी पोलिसांनी बादशाहविरोधात चालान जारी केले आहे. १५ डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. पंजाबी गायक करण औजला यांच्या संगीत महोत्सवात सहभागी होण्यासाठी बादशाहला रविवारी (दि. १५) ऐरिया मॉलमध्ये पोहोचायचे होते. त्यावेळी या मार्गातील वाहतूक खोळंबलेली होती. त्यामुळे बादशाहच्या ताफ्यातील वाहनाने विरुद्ध दिशेने जाऊन वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. यावेळी त्याच्या गाडीचा वेगही जास्त होता. बेजबाबदारपणे वेगात विरुद्ध दिशेने धावणाऱ्या त्याच्या गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सेलिब्रिटीविरोधात पोलीस विभाग काय कारवाई करणार?, असा सवालही अनेकांनी सोशल मीडियावर उपस्थित केला होता.