मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील त्याच्या घरावर रविवारी आंदोलकांनी हल्ला केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आठ सदस्यांना अटक केली.
यावेळी अल्लू अर्जुनच्याच्या घराबाहेर ठेवलेली भांडी फोडली, रागाच्या भरात संपूर्ण लॉन फाडले आणि टोमॅटो फेकले. याप्रकरणी जेएसी नेत्यांवर तोडफोड केल्याचा आरोप आहे. तसेच पोलिसांनी जेएसी नेत्यांना ताब्यात घेतल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
या प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पोलिसांनी म्हटलं की, “उस्मानिया युनिव्हर्सिटीशी संबंधित असलेल्या जेएसीच्या 6 कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. पण अद्याप या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. या घटनेनंतर अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांना कोणतेही अपशब्द न वापरण्याचं आवाहन केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुष्पा 2 च्या प्रीमियर दरम्यान, संध्या थिएटरमध्ये दि. 04 डिसेंबर रोजीचेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या 8 वर्षांच्या मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. तो अजूनही व्हेंटिलेटरवर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याच प्रकरणात अल्लू अर्जुनला अटकही करण्यात आली होती. मात्र, तेलंगणा उच्च न्यायालयाने 4 आठवड्यांच्या अंतरिम जामिनावर सुटका केली.