पुणे : ‘अथांग’चा ट्रेलर झळकल्यापासून प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत. या वाड्यात नक्की काय गूढ दडले आहे, ही अळवत कोण आणि तिचा सरदेशमुखांच्या वाड्याशी काय संबंध? त्या कड्यामागील रहस्य ? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. मात्र आता या प्रश्नांचा उलगडा होणार असून प्लॅनेट मराठी ओटीटीवर जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे.
‘अथांग’मध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या भूमिका आहेत.
‘अथांग’ चे दिग्दर्शक जयंत पवार म्हणतात, ” ‘अथांग’ म्हणजे ज्याचा थांग लागत नाही असे. या वेबसीरिजचीही हीच खासियत आहे. शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही कथा आहे. ‘अथांग’चा प्रत्येक भाग क्षणोक्षणी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे. ‘अथांग’ पाहून झाल्यावरही पुढचे काही दिवस प्रेक्षकांच्या डोक्यात तेच असेल. १९३० आणि १९६०च्या कालखंडात घडणारी ही कथा असून ‘अथांग’ बघताना आपणही तो काळ जगतोय, अशी जाणीव होईल. हळूहळू यातील एकेक गूढ उलगडत जाईल.”
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”ओटीटीवर प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी पिरिऑडिक ड्रामा आहे. ज्यात रहस्य दडले आहे. हा एक वेगळा विषय आहे. ‘अथांग’च्या निमित्ताने तेजस्विनी पंडित पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. तेजस्विनी एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे, हे आपल्याला माहीतच आहे. आता आपल्या इतक्या वर्षांच्या अनुभवाचा उपयोग तिने निर्मिती क्षेत्रातही केला आहे. त्यामुळे अभिनय, तांत्रिक अशा सगळ्याच बाजू तिने उत्तमरित्या सांभाळल्या आहेत. प्लॅनेट मराठी सातत्याने प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आणण्याच्या प्रयत्नात असते, त्यामुळे ‘अथांग’ची ही वेगळी संकल्पना आम्हाला भावली.”
प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत ‘अथांग’चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत.