Anant -Radhika Wedding : गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जगात चर्चा असलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा अखेर पार पडला आहे. मुंबईत दोघेही विवाहबंधनात अडकले. या लग्नाला फक्त देश नाही तर जगभरातील दिग्गजांनी उपस्थिती लावली. अत्यंत राजेशाही थाटात झालेलं हे लग्न एखाद्या स्वप्नाप्रमाणे होते.
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचं म्हणजेच अनंत अंबानी यांच्या लग्नाचा थाट संपूर्ण देशाने पाहिला. हा लग्नाचा सोहळा इतका मोठा होता की, भव्यदिव्य हा शब्दही लहान पडेल म्हणूनच या लग्नाची चर्चा जगभरात झाली. कारण, जगातला सर्वात महागडा लग्नसोहळा अशी त्याची नोंद झाली आहे.
तसेच अनंत अंबानींच्या लग्नाची पत्रिकाही अतिशय खास होती. लग्नाच्या पत्रिकेत मंदिराची प्रतिकृती, त्यात देव-देवतांच्या सोन्याच्या मूर्ती होत्या. तसेच अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगच्या सोहळ्यात कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. तर विवाह सोहळ्याला उपस्थित पाहुण्यांना तब्बल दोन कोटी रुपयांची घड्याळं भेट देण्यात आली. तसेच लग्नातील जेवणावळींसाठी जगभरातील 10 प्रसिद्ध शेफनी पदार्थ बनवले होते. जगभरातील तब्बल 2500 पदार्थांची रेलचेल या सोहळ्यात पाहायला मिळाली. मेन्यूमध्ये खास भारतीय पदार्थांसोबत जगभरातील प्रसिद्ध पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या मध्यापासून जवळपास आठवडाभर या विवाहातील वेगवेगळे कार्यक्रम टप्प्याटप्प्यात पार पडले. अंबानींच्या लग्नामधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये जागतिक स्तरावरील गायक जस्टीन बिबर, रिहाना, दिलजीत दोसांजबरोबरच अगदी दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून हिंदी मनोरंजनसृष्टीपर्यंत जवळपास सर्वच मोठे सेलिब्रिटी उपस्थित होते.
राधिका आणि अनंत यांनी 12 जुलै रोजी सप्तपदी घेतल्या. मात्र या लग्नाची संपूर्ण तयारी, सेलिब्रिटींना परफॉर्मन्ससाठी दिलेलं मानधन आणि एकंदरित तयारीच्या खर्चाची आकडेवारी नुकतीच समोर आली. एकूण संपत्ती 10 लाख 28 हजार 544 कोटी रुपये असलेल्या अंबानी कुटुंबाने धाटक्या लेकाच्या लग्नासाठी तब्बल 5 हजार कोटी रुपये खर्च केल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.