पुणे प्राईम न्यूज डेस्क: सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती १६’ मध्ये या आठवड्यात होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर रेणुका पाटणशेट्टी ही सोलापूरहून आलेली प्राथमिक शाळेची शिक्षिका असेल, गेल्या २४ वर्षांपासून रेणुका अमिताभ बच्चनसमोर या हॉटसीटवर बसण्याचे स्वप्न बघत आहे आणि आता तिचे स्वप्न साकार होत आहे. लहान मुलांची शिक्षिका असल्याने रेणुकाने शिक्षण मजेदार आणि हवेहवेसे कसे करता येईल, याचे क्रिएटिव्ह मार्ग शोधले आहेत. आपण गाण्यांमधून आणि कृतींमधून पाढे कसे शिकवतो हे तिने बिग बींना सांगितले. या अनोख्या पद्धतीमुळे तिच्या विद्यार्थ्यांना पाढे शिकायला तर मदत होतेच, शिवाय ती प्रक्रिया रटाळ न होता मजेदार होते.
संभाषणाच्या ओघात रेणुकाने अमिताभ बच्चन यांना उत्सुकतेने विचारले, सर, तुम्ही कोणतेही गाणे किंवा एखादी कविता मला ऐकवाल का? त्यावर नेहमीचे मोहक स्मितहास्य करत बिग बी म्हणाले, हे गाणं-बिणं आम्ही थोडेच गातो! रेणुकाने जेव्हा हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांचा उल्लेख केला, तेव्हा आपल्या पित्याच्या आठवणीत मग्न होत बिग बी म्हणाले, अशा तर बऱ्याच कविता आहेत. ‘मधुशाला’ मधली एक ओळ आहे, जी मी म्हणून दाखवतो. असे सांगून अमिताभ बच्चन यांनी ‘मधुशाला’ या हरिवंशराय बच्चन यांच्या गाजलेल्या कवितेची एक ओळ म्हटली. त्यानंतर त्यांनी कवितेतील शब्दांचा गर्भितार्थही सांगितला.
त्यानंतर रेणुकाने गाण्यांमधून पाढे शिकवण्याची जी अनोखी पद्धत सांगितली त्याच्याशी तुलना करत बिग बींनी एक आपली लहानपणीची आठवण शेअर केली, बाबूजी पहाटे चार वाजता फिरायला जात असत, आम्हालाही घेऊन जायचे. चालता चालता म्हणायचे, पाढे म्हणा आणि एखादी चूक झाली की टपली पडायची, मग लक्षात राहू लागले. पुढे ते हसत हसत म्हणाले, पण तुमची पद्धत जास्त चांगली आहे. खूपच छान.