पुणे प्राईम न्यूज डेस्क: ‘बस इतना सा ख्वाब’ मालिकेत अभिनेत्री राजश्री ठाकूर अवनीच्या रूपात प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. ‘बस इतना सा ख्वाब’ ही एक लक्षवेधी कथा असून त्यातून अवनीचा प्रवास पाहायला मिळतो आणि ही मालिका हा संदेश देते की, ज्या स्त्रिया आपले घर इतके सुंदरपणे सांभाळू शकतात, त्या सहजपणे जगामध्ये पाऊल ठेवून काम करू शकतात आणि यशस्वीही होऊ शकतात.
झी स्टुडिओज निर्मित ही मालिका फक्त झी टीव्हीवर दिसणार आहे. त्यातील प्रमुख जोडी राजश्री ठाकूर आणि योगेंद्र विक्रमसिंग जे अनुक्रमे अवनी आणि शिखर यांच्या भूमिका साकारत आहेत. याबाबत राजश्री म्हणाली, आमची मालिका ‘बस इतना सा ख्वाब’च्या सुरुवातीसाठी आम्ही कानपूरमध्ये आहोत, या गोष्टीचा मला अतिशय आनंद आहे. या शहरामध्ये आम्ही काही भागांचे चित्रीकरणही केले आणि आम्हाला येथील लोकांकडून, अगदी पहिल्या दिवसाच्या चित्रीकरणापासून खूप प्रेम आणि समर्थन मिळाले.
एक स्त्री म्हणून अवनीसारख्या गृहिणींचे संघर्ष, त्यांची स्वप्ने आणि ताकद मी समजू शकते. मला आशा आहे की, देशभरातील प्रत्येक स्त्री अवनीमधून त्यांची स्वप्ने आणि आकांक्षा यांचे प्रतिबिंब पाहू शकतील. काही अतिशय गुणी स्त्रिया आणि त्यांचा संघर्ष आणि कठोर मेहनत यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले आणि त्यांच्या भावस्पर्शी कथा ऐकण्याची संधी मला लाभली. मी आशा करते की, या कथा आणि आम्ही सुरू करत असलेला हा प्रवास दुसऱ्यांना ताकद आणि आशा प्रदान करेल आणि त्यांना हा विश्वास राखण्यास मदत करेल, की कुठलेही स्वप्न छोटे नाही आणि कुठलेही स्वप्न पाहणारी व्यक्ती ते खरे करण्यासाठी साधारण नाही.