अभिनेता विक्रांत मेस्सीला विधू विनोद चोप्रा यांच्या ’12th फेल’ चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. प्रेक्षक-समीक्षकांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला. सर्वच जण त्याच्या खासगी आयुष्याविषयी त्याला प्रश्न विचारत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने त्याच्या घरच्यांविषयी सांगितलं. वयाच्या १७ व्या वर्षी विक्रांत मेस्सीच्या भावाने धर्मपरिवर्तन करून इस्लाम धर्म स्वीकारला.
भावाने वयाच्या 17 व्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारताना वडिलांची काय प्रतिक्रिया होती, याचा खुलासा अभिनेत्याने केला आहे. तो म्हणाला, “माझ्या भावाचं नाव मोईन असं आहे. त्याचं नाव मोईन का आहे, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर यामागचं कारण म्हणजे त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आहे आणि माझ्या कुटुंबीयांना त्याला तशी परवानगी दिली आहे. ते त्याला म्हणाले, बेटा जर तुला त्या धर्मात समाधान मिळत असेल तर पुढे जा. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने धर्मांतर केलं आणि ती खूप मोठी गोष्ट होती.
विशेष म्हणजे विक्रांत मेस्सीची आई सिखणी आहे. तर वडील ख्रिश्चन आहेत. आठवड्यातून दोन वेळा ते चर्चमध्ये प्रार्थनेसाठी नक्की जातात.
भावाच्या धर्मांतराविषयी जेव्हा नातेवाईकांना समजलं, तेव्हा त्यांनी विक्रांतच्या वडिलांना विविध प्रश्न विचारले. “तुम्ही तुमच्या मुलाला इस्लाम धर्म स्वीकारण्याची परवानगी कशी देऊ शकता, असे बरेच सवाल नातेवाईकांनी वडिलांना केले होते. त्यावर ते त्यांना म्हणाले की हा तुमचा प्रश्न नाही. तो माझा मुलगा आहे, तो फक्त मला उत्तर देण्यास बांधिल आहे आणि त्याला जे करायचंय ते करण्याचे अधिकार त्याला आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर माझ्या मनात धर्म काय आहे, याविषयी प्रश्न उपस्थित आहे. हे सर्व मानवनिर्मित आहे”,असं विक्रांत म्हणाला.