मुंबई: शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या अडचणी वाढू शकतात. गौरी खान ही लखनौस्थित रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. ईडी गौरी खानची चौकशी करण्याच्या तयारीत आहे. या कंपनीवर गुंतवणूकदार आणि बँकांना अंदाजे 30 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा आरोप आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपानंतर या कंपनीबरोबर अभिनेता शाहरुखची पत्नी गौरी खान ही देखील चौकशीच्या फेऱ्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरी खानला नोटीस बजावण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या मुख्यालयाची परवानगी घेण्याची तयारी सुरू आहे. परवानगी मिळाल्यानंतर ईडी गौरी खानची चौकशी करणार आहे. तुलसियानी ग्रुपने गौरीला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यासाठी किती पैसे दिले आणि हे पैसे तिला कसे दिले याची माहिती घेण्यासाठी ईडीचे अधिकारी गौरीची चौकशी करतील. यासाठी कोणकोणत्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली असून या कराराची कागदपत्रेही त्यांच्याकडून घेण्यात येणार आहेत.
काय आहे प्रकरण?
तुलसियानी ग्रुपचा लखनौमध्ये सुशांत गोल्फ सिटीमध्ये एक प्रकल्प आहे. मुंबईचे रहिवासी किरीट जसवंत शहा यांनी 2015 मध्ये या प्रकल्पातील एक फ्लॅट 85 लाख रुपयांना खरेदी केला होता, परंतु कंपनीने त्यांना ना ताबा दिला आहे ना रक्कम परत केली आहे. त्यामुळे जसवंत शहा यांनी तुलसियानी समूहाचे संचालक अनिल कुमार तुलसियानी, महेश तुलसियानी आणि गौरी खान यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात किरीट जसवंत शाह यांनी गौरी खानवर आरोप करत म्हटले की, या प्रकल्पाची जाहिरात गौरी खानने केली होती आणि त्यामुळेच गौरी यांच्यावर विश्वास ठेवून ही मालमत्ता घेतली. मात्र त्यांच्या कष्टाच्या पैशातून खरेदी केलेला फ्लॅट त्यांना मिळू शकला नाही. या प्रकरणी आता परवानगी मिळाल्यानंतर ईडी गौरी खानची चौकशी करू शकते.