सातारा : मराठीसह दक्षिणेत भारत मनोरंजनसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साताऱ्यामध्ये शिंदे यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. गुरुवारी 11 एप्रिल 2024 रोजी छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या सयाजी शिंदे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर सातारा येथील प्रतिभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. शिंदे यांच्यावर उपचार करणारे डॉ. सोमनाथ साबळे यांनी प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितले की, “सयाजी शिंदेंना काही दिवसांपूर्वी अस्वस्थता जाणवत होती. त्यामुळे शिंदे काही तपासण्या करुन घेतल्या. दरम्यान ईसीजीमध्ये काही मायनर चेंजेस आम्हाला सापडले. त्यामध्ये त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल थोडी कमी झाली असल्याचं जाणवलं होतं”, असं साबळे यांनी म्हटलं आहे.