मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया या दाम्पत्याला बँकांकडून ११६ कोटी रूपये कर्ज देण्यात ‘गडबड’ झाली आहे. त्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जात अनियमितता केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. आणि याबाबत सरकारकडून चौकशीचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत.
अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या लातूर येथील कृषी प्रक्रिया कंपनीसाठी ११६ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात सहकारी बँकांनी अनियमितता केली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृषी प्रक्रिया कंपनी देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडला त्यांच्या मूळ गावी लातूरमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा भूखंड मिळाल्याचा सुद्धा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्याबाबत भाजपने चौकशीची मागणी केली होती, त्यानुसार आता चौकशी करण्यात येत आहे.
भाजप नेत्यांचा आरोप
राज्यातील भाजपच्या नेत्यांनी थेट आरोप केला होता की कंपनीने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता आणि बँकेने २७ ऑक्टोबर रोजी ४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यासाठी मंजूरी सुद्धा मिळाली.
त्यानंतर कंपनीने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता आणि २७ ऑक्टोबर रोजी बँकेकडून ६१ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. बँकेकडून आणखी ५५ कोटी रुपयांचे कर्ज २५ जुलै २०२२ रोजी मंजूर करण्यात आले.
महाराष्ट्राचे सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, रितेश देशमुख यांच्या कंपनीने बँकांकडून आवश्यक ते निकष न पाळता निधी मंजूर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजपचे लातूर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी पत्र लिहून हाच मुद्दा उपस्थित केला होता. मला एमआयडीसीबद्दल काहीही माहिती नाही, पण बँकेकडून काही गैरव्यवहार झाला आहे का, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दरम्यान, रितेश देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिवंगत विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. त्यांचा मोठा भाऊ अमित हे एमव्हीए सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यांचा लहान भाऊ देखील लातूर ग्रामीण मतदारसंघातून आमदार आहे त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना गांभीर्याने घेत त्यावर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. असे सावे यांनी सांगितले