Entertainment : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज-शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक कथानकामुळे मालिकेला प्रेक्षकांचे भरपूर कौतुक आणि प्रेम मिळत आहे. भारतीय चित्रपट उद्योगाच्या चमकदार पार्श्वभूमीवर बेतलेल्या या मालिकेत शिवांगी सावंत (खुशी दुबे) या महाराष्ट्रातल्या एका छोट्या शहरातील मुलीची कहाणी सांगितली आहे. ‘संगम सिनेमा’ हे आपल्या दिवंगत वडीलांचे आता बंद पडलेले सिंगल स्क्रीन चित्रपटगृह पुन्हा एकदा चालू करण्याचा निर्धार शिवांगीने केला आहे. तिच्या खटपटीत तिची सुपरस्टार अयान ग्रोव्हर (अभिषेक बजाज) म्हणजे AGशी ओळख होते. अयान अत्यंत लोकप्रिय स्टार आहे. त्या दोघांच्या भेटीमधून एक अनपेक्षित रोमान्स फुलतो. अभिषेक बजाजने आपली AG ही व्यक्तिरेखा, ही मालिका आणि इतर अनेक गोष्टींविषयी दिलखुलास गप्पा मारल्या, त्याचा हा अंश:
1. तू ‘ज्युबिली टॉकीज-शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ या मालिकेविषयी आम्हाला काय सांगशील?
या मालिकेकडून मला फार अपेक्षा आहेत. मी जेव्हा पहिल्यांदा मालिकेचे कथानक ऐकले, तेव्हा मला वाटले की, सगळ्यांना ही मालिका बघायला आवडेल. अशा मालिका फारशा बनत नाहीत. किंबहुना, मी तर नेहमी सगळ्यांना सांगत असतो की, कथेमध्ये नावीन्य आणले पाहिजे आणि त्यासाठी वेगवेगळे विषय हाताळले पाहिजे. प्रेम आणि नाट्याचे वेधक चित्रण करणारी ही मालिका एका अनपेक्षित प्रेमकहाणीवर प्रकाशझोत टाकते. एक प्रभावी सुपरस्टार अयान ग्रोव्हर आणि चित्रपटगृहाची मालकीण शिवांगी सावंत या अत्यंत भिन्न विश्वात राहणाऱ्या दोन व्यक्तींची टक्कर होऊन रोमान्सचा झंजावात सुरू होतो.
2. अयान ग्रोव्हरची भूमिका तू स्वीकारलीस, त्यामागचे कारण काय होते?
मला, पहिल्यापासून वेगवेगळ्या भूमिका करण्यात रस होता. मला एक मेगास्टार आणि त्याचा बॉडी डबल असा डबल रोल करायला मिळणार याचा आनंद मला होता. ही भूमिका मला खूप रोचक वाटली आणि मी साकारत असलेल्या दोन्ही व्यक्तिरेखांच्या भावना गुंतागुंतीच्या आहेत, जे एक अभिनेता म्हणून मला आव्हानात्मक वाटले.
3. अयान ग्रोव्हर आणि तुझ्यात किती साम्य किंवा अंतर आहे?
त्याचे व्यावसायिक जीवन हे बरेचसे माझ्यासारखे आहे, कारण मी अनेक चित्रपटांत काम केले आहे. ते जीवन मी जगलो आहे. हे एवढेच आमच्यातले साम्य आहे. पण त्याचे वैयक्तिक जीवन मात्र फारच गुंतागुंतीचे आहे. प्रत्येकाशी असलेले त्याचे नाते वेगळे आहे. काही जणांच्या बाबतीत तो अधिकार गाजवतो, काही लोकांची मर्जी सांभाळतो, कधीकधी एखाद्याकडून त्याला प्रेमाची अपेक्षा असते, तर कधी तरी तो एकाकी असतो. त्याचे व्यक्तिगत जीवन समजून घेणे आव्हानात्मक आहे.
4. तुला जेव्हा अयान ग्रोव्हर ही व्यक्तिरेखा देण्यात आली, तेव्हा तुझ्या मनात आलेला पहिला प्रश्न कोणता होता?
“मी ही भूमिका का करावी? मी ती करावी की नाही?” हा प्रश्न मी सर्वात आधी स्वतःला विचारला. त्यानंतर मी माझ्या मनातल्या शंका दूर करण्यासाठी निर्मात्यांना विचारले की, ही कशा प्रकारची मालिका आहे? त्यातून काय मांडायचे आहे? मला वाटले की, नेहमीसारखी साचेबंद मालिका नाही. एक सुपरस्टार एका सामान्य मुलीच्या प्रेमात पडतो ही परिकथेसारखी गोष्ट मला भावली. ही अगदी असंभव वाटणारी कथा प्रेक्षकांना एका स्वप्नील जगात घेऊन जाते. आमचे निर्माते सौरभ तिवारी सर आणि सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन प्रेक्षकांसमोर ही अनोखी कहाणी सादर करत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे.
5. ही भूमिका करताना तू कोणत्याही सुपरस्टारकडून प्रेरणा घेतली आहेस की स्वतः एक अस्सल व्यक्तिरेखा उभी करण्याचा प्रयत्न करत आहेस?
नाही, मी कधीच कोणत्याही सुपरस्टारला अनुसरले नाही किंवा त्याची नक्कल करण्याचा प्रयत्नही केलेला नाही. मी कोणतीही व्यक्तिरेखा साकारतो, तेव्हा ती शक्य तितकी यथार्थ वाटेल असा माझा प्रयत्न असतो, कारण त्या क्षणी ती व्यक्तिरेखा माझ्यात भिनलेली असते आणि मी त्या व्यक्तिरेखेचेच जीवन जगत असतो.
बघत रहा, ‘ज्युबिली टॉकीज : शोहरत-शिद्दत-मोहब्बत’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!