–संतोष पवार
पळसदेव : डॉ. आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) धर्तीवर वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र (वनार्टी) (WANARTI) ही स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. गोर बंजारा जमातीतील मागसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे. मुंबई येथे वनार्टी संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली असून या संस्थेकरिता 50 कोटींची तरतूद देखील करण्यात आली आहे.
गोर बंजारा या मागासलेल्या जमातीच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या जमातीचे संशोधन व अभ्यास करण्यासाठी, त्यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकडे प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी, तसेच या घटकांतील विद्यार्थी, युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध कार्यक्रम/उपक्रम राबवण्यासाठी ‘वनार्टी’ ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली आहे.
गोर बंजारा जमातीसह काही प्रमाणात विमुक्त जाती, भटक्या जमाती-ब, भटक्या जमाती-क व भटक्या जमाती-ड यांना यामध्ये स्थान असणार आहे. या संस्थेकरिता व्यवस्थापकीय संचालक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि निबंधक अशा एकूण तीन नियमित पदांना मान्यता देण्यात आली आहे.