नवी दिल्ली: शैक्षणिक धोरणानुसार, चार वर्षांची पदवी धारण करणारे विद्यार्थी आता थेट राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा (नेट) तसेच पीएच. डी. करण्यास पात्र असणार आहेत. ज्युनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) किंवा त्याशिवाय पीएच. डी. करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात किमान ७५ टक्के किंवा समकक्ष ग्रेड बंधनकारक असणार आहे, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष जगदीश कुमार यांनी रविवारी दिली.
देशात नेट परीक्षा देण्यासाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळवणे आवश्यक होते. तसेच अनुसूचित जाती व जमीतीच्या (एससी/एसटी) विद्यार्थ्यांसाठी किमान ५० टक्के गुणांची अट होती. परंतु, देशात नेट परीक्षा देणे व पीएच. डी. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यूजीसीने नवे नियम जाहीर केले आहेत. या संदर्भात पीटीआयला माहिती देताना यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार म्हणाले की, चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार आता थेट पीएच. डी. करू शकतात व ते नेट परीक्षेला सुद्धा बसू शकतात. या विद्यार्थ्यांनी इतर कोणत्याही विषयात चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असला तरी ते पीएच. डी. साठी पात्र असणार आहेत. चार वर्षे किंवा ८ सेमिस्टरची पदवी उत्तीर्ण ( असलेल्या उमेदवाराकडे एकूण किमान ७५ टक्के गुण किंवा त्याच्या” समकक्ष ग्रेड असणे आवश्यक आहे, असे कुमार यांनी सांगितले.
यूजीसीचे नवे नियम व वेळोवेळी घेतलेल्या निर्णयानुसार, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी) (नॉन-क्रमिलेअर), दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्लूएस) आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांना ५ टक्के गुण कमी किंवा समकक्ष ग्रेडमधून सूट दिली जाऊ शकते, असेही जगदीश कुमार यांनी स्पष्ट केले.