पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राखीव जागांच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची मुदत ३१ मे रोजी संपत आहे. आतापर्यंत राज्यभरातून २ लाख पालकांचे अर्ज आले आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा दुप्पट अर्ज आल्याने आरटीईला भरघोस प्रतिसाद मिळाला असला तरी प्रवेशावेळी चुरस रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरटीई प्रवेशप्रक्रिया जुन्या पद्धतीनुसार राबवली जात असल्याने पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला. यापूर्वी शासनाने आरटीई कायद्यात बदल केल्याने यास पालकांकडून विरोध करण्यात आला. तसेच अर्जनोंदणीत हव्या त्या शाळांचा पर्याय उपलब्ध होत नसल्याने पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली होती. आरटीई ऑनलाइन अर्जनोंदणीसाठी अजून २ दिवसांचा अवधी असल्याने अर्जाची संख्या २ लाखांच्या पुढे जाणार हे निश्चित आहे. यंदा राज्यातील ९ हजार २०४ शाळांनी आरटीईची नोंदणी केली आहे.
एकूण १ लाख ५ हजार ६४ इतक्या प्रवेशक्षमतेवर प्रवेश दिले जाणार आहेत. अर्ज करताना इंग्रजी शाळांचा पर्याय उपलब्ध झाल्याने अर्जनोंदणीच्या पहिल्या दिवसांपासून मोठ्या संख्येने अर्ज यायला सुरुवात झाली. अर्जनोंदणीची मुदत संपल्यानंतर लॉटरीद्वारे प्रवेश देण्याची तारीख जाहीर केली जाईल. यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात होणार आहे. राज्यात सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून आले असून, सर्वात कमी अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आले आहेत.