लोणी काळभोर : पृथ्वी ही आपल्या सर्वांचे घर आहे. आणि जर या घराविषयी आपल्याला आस्था असेल, तर तिला स्वच्छ, नीटनेटके ठेवायला नको का? आपण जर पृथ्वीला आई म्हणत असेल तर काळजी घेण्याची भावना मनाच्या तळापासून असायला हवी. पृथ्वीवरील निसर्ग, पर्यावरण, यांचे आरोग्य राखणे, ही वैश्विक जबाबदारी हि आजच्या विद्यार्थ्यांची आहे. कारण आजचा विद्यार्थी हा उद्याचा सुजाण नागरिक आहेत. असे मत ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या समाजसेविका अंजली राईलकर यांनी मांडले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये शनिवारी (ता.१) मातृभूमिपूजन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना वरील मत अंजली राईलकर यांनी मांडले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर, शाळेच्या विश्वस्त मंदाकिनी काळभोर. अॅडमीन प्रियांका सुभेदार आणि ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या समाजसेविका परिमाला पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना राईलकर म्हणाल्या, ‘माणसाने आजवर केलेले अत्याचार पृथ्वी मातेने सहन केले आहेत. पण माणूस ज्या प्रकारे पृथ्वीला ओरबाडतो आहे, त्यासाठी तंत्रज्ञान वापरतो आहे, लोकसंख्या वाढवतो आहे, त्या सगळ्याची एक सीमारेषा आता येऊन पोहोचली आहे. यापुढे पृथ्वी हे सारे मूकपणे ऐकून घेणार नाही. विविध मार्गांनी ती आपल्याला हे सुचवूही लागली आहे. त्यामुळे अतिरेकी उपभोगवाद थांबायलाच हवा. आयुष्यात संतुष्ट राहण्यासाठी नक्की काय अग्रक्रमावर असले पाहिजे, हे आपल्याला कळायला हवे. असे राईलकर यांनी सांगितले आहे. तसेच यावेळी आयुर्वेदातील शास्त्रज्ञाची आणि विक्रम भत्रा या स्वातंत्र्यवीराची गोष्ट सांगितली.
यावेळी बोलताना नितीन काळभोर म्हणाले, करोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा खरेच कोणत्या आहेत, हे मानवजातीला कळून चुकले आहे. आता गरज आहे, ती सामाजिक निर्बंधांचा काळ संपल्यावर, पर्यावरणीय नीतिशास्त्रात झालेल्या चुका सुधारण्याची. असे काळभोर यांनी सांगितले.
ज्ञान प्रबोधिनीच्या समाजसेविका परीमला पांडे यांनी, विद्यार्थ्यांकडून मातृभूमीचा श्लोक म्हणून घेतला. यावेळी स्वामी विवेकानंदांची मातृभूमीबद्दलची कविता देखील सादर करण्यात आली. तसेच विविध प्रकारचे झाडे लावून वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
दरम्यान, वरील व्याख्यान विद्यार्थी तल्लीन होऊन ऐकत होते. तसेच आईप्रमाणेच आपल्या भूमीचे देखील काळजी घेतली पाहिजे, रस्त्यावर थुंकू नये, कचरा टाकू नये, नियमांचे पालन करावे, इत्यादी गोष्टींचा सुरुवात आपल्यापासूनच करावी. याबाबत सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन पायल बोळे यांनी केले आहे. तर सूत्रसंचालन व आभार मनीषा सुपेकर यांनी मांडले