अयुब तांबोळी (शिक्षक, जिल्हा परीषद शाळा, फुटाणवाडी, पाबळ ता. शिरूर)
शिरूर : लहानपणापासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाचा मुलमंत्र हा मराठी मधून वाचावयास व लिहावयास मिळाला. त्यामुळे आजही शिक्षणात, व्यवहारात व समाजात बोलीभाषेतही मराठीच वाचली, बोलली व लिहली जाते. समाजात वेगवेगळ्या भाषांना दर्जा प्राप्त झाला आहे. तसाच मराठीला ही दर्जा मिळण्यासाठी भाषा गौरव करणे महत्वाचे आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून महाराष्ट्रातील सर्वांची मायबोली मराठी आहे. आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा आणि मातृभाषेच्या गौरवाचा दिन आहे. कुसुमाग्रज हे थोर साहित्यिक असून मराठीत त्यांची लेखणी मराठीच्या गौरवासाठी नेहमीच अग्रगण्य राहिले आहे. साहित्यिकाचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांच्या जन्मदिनी मराठीचा केलेला गौरव हा खरोखरच कौतुकास्पद आहे.
आपले विचार व्यक्त करण्यासाठी सर्वात महत्त्वाची भाषा म्हणजे मातृभाषा असते. आपली मातृभाषा मराठी असून मराठीचा राजभाषा म्हणून नुसता गौरव होणे पुरेसे नसून शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक व इतरही क्षेत्रात मराठीचा वापर जास्तीत जास्त करणे हे आपले कर्तव्य आहे.
याकरिता आपण आपल्या मुलांना मराठीच्या वाचनाची गोडी लावणेही गरजेचे आहे. मराठी भाषेत खूप सारे साहित्य वाचावयाला मिळते. ते साहित्य आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून शालेय जीवनापासूनच त्यांना मराठी भाषेची आवड निर्माण करून त्याची गोडी लावली पाहिजे. घरामध्येही जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करून मराठीची आवड घरातूनच निर्माण केली गेली पाहिजे हाच खरा मराठी राजभाषेचा गौरव होईल.
शब्दांकन – युनुस तांबोळी