पुणे : पोलीस हवालदाराची जुळी मुले अधिकारी क्लास वन अधिकारी झाले आहेत. त्यातील एक उपविभागीय दंडाधिकारी तर दुसरा नायब तहसीलदार झाला आहे. या दोघांनी आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले असून ते आज इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.
जसराना (फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) येथील सिंगपूर भागात राहणारा अशोक यादव सध्या मथुरा कोतवाली येथे हवालदार म्हणून तैनात आहे. त्यांचे कुटुंब आग्रा येथे राहते. त्यांना दोन जुळी मुले आहेत. मोहित यादव आणि रोहित यादव अशी त्यांची नावे आहेत.
आई-वडिलांनी दोन्ही मुलांना खूप शिकवले. रोहित आणि मोहित एकत्र शिकले. दोघेही लहानपणापासून अभ्यासात हुशार होते. दोन्ही भावांनी प्रत्येक परीक्षेला एकमेकांना साथ दिली. डेहराडूनमध्ये आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षण आग्रा पब्लिक स्कूलमध्ये केले.
आग्रा येथे राहत असताना दोघांनी इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर दोघांनी २०१७ मध्ये एचबीटीयू, कानपूर येथून बी टेक पूर्ण केले.
त्यानंतर पुढे दोघेही यूपीएससी परीक्षेची तयारी करू लागले. पहिल्याच प्रयत्नात दोघांचीही निराशा झाली. पण त्यांनी हिंमत हारली नाही, मेहनत करत राहिले. त्यानंतर २०१९ मध्ये मोहित आणि रोहितने दुसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा पास केली. मोहित यादव याची एसडीएम तर रोहित यादव याची नायब तहसीलदार म्हणून निवड झाली आहे.