पुणे : दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षेसाठी तब्बल १३ कोटी ४८ लाख ९५० रुपये शुल्क मंडळाच्या खात्यात जमा झाले आहे. ज्यात दहावीसाठी ६ कोटी ७५ लाख ७८ हजार ७५० रुपये आणि बारावीच्या परीक्षेसाठी ६ कोटी ७३ लाख ५ हजार २०० रुपये परीक्षा फी म्हणून जमा करण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून दहावी-बारावी परीक्षा सुरु होणार आहे. यंदाची बारावीची परीक्षा (HSC Exam) २१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा (SSC Exam) २ ते २५ मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. मात्र याच परीक्षेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने परीक्षा शुल्क घेण्यात येते. विद्यार्थ्यांकडून जमा करण्यात आलेली ही रक्कम पुढे विभागीय शिक्षण मंडळाकडे जमा केली जाते.
या शुल्कातून परीक्षेचे सर्व साहित्य, मंडळाची दैनंदिन खर्च, कर्मचारी अधिकाऱ्यांचे वेतन, पेन्शन खर्चही यातून भागवले जाते. तर शुक्रवार २७ जानेवारीपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉलतिकिट मिळणार आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र यावेळी परीक्षेत काही बदल करण्यात आले आहे. ज्यात गेल्यावर्षी परीक्षेसाठी देण्यात आलेली होम सेंटर पद्धत बंद करण्यात आली आहे. सोबतच दहावी- बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे.