संतोष पवार
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारा १० नोव्हेंबर २०२४ रोजी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा घेण्यात आली होती. या शिक्षक पात्रता परीक्षेची (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. या उत्तरसूचीवर १६ डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी याबाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली.
टीईटीमध्ये पेपर एक आणि पेपर दोन अशा परीक्षांचा समावेश होता. या प्रश्नपत्रिकांतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास त्याबाबत परिषदेच्या http:// mahatet. in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉग इनमध्ये आक्षेप नोंदणीसाठीचा दुवा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या दुव्याद्वारे उमेदवारांना आक्षेप नोंदवता येणार आहे.
लेखी निवेदन समक्ष टपालाने किंवा ईमेलद्वारे पाठवल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. दिलेल्या मुदतीत ऑनलाइन दाखल केलेल्या आक्षेपांचा विचार करून विषयतज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.