लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षक दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाब पुष्प, शुभेच्छा पत्र व छोटी भेटवस्तू देऊन शिक्षक दिन साजरा केला.
विद्यालयात सर्वात प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर, विश्वस्त मंदाकिनी काळभोर, प्राचार्या मिनल बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना नितीन काळभोर म्हणाले, शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. समाज परिवर्तन करणारा अत्यंत महत्वाचा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात. असे काळभोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने इयत्ता ४ थीच्या मुलांनी नृत्यातून गुरुवंदना सादर केली. तसेच ‘तेरी पणाहमे हमे रखणा हे समूह गीत इयत्ता ४ थी व ७ वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांनी छोटा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये प्रत्येक शिक्षकांचे आवडते गाणे लावून शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. तसेच शिक्षकांसाठी मनोरंजन खेळ घेण्यात आले.
दरम्यान, विद्यालयातील एक दिवसाचे विद्यार्थी शिक्षक बनले होते. यामध्ये इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पहिले ते सहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन शिरीन सय्यद यांनी केले.