लोणी काळभोर, ता.०६ : लोणी काळभोर (ता.हवेली) येथील इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षक दिन मंगळवारी (ता.०५) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती शाळेच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे यांनी दिली.
शाळेत सर्वात प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन पुणे विभागप्रमुख प्राचार्य सिताराम गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या इन्चार्ज सुलताना ईनामदार, शिक्षिका गेयती टिळेकर, प्रिती कदम, शाहीन शेख, हर्षा शितोळे प्रियांका काळभोर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्या पौर्णिमा शेवाळे म्हणाल्या की, ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा स्मृतिदिन आहे. हा दिवस आपल्या भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. ५ सप्टेंबर १८८८ रोजी डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म झाला. डॉ. राधाकृष्णन हे एक शिक्षक होते. तसेच ते भारताचे दुसरे राष्ट्रपतीही होते. त्यांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो’.
दरम्यान, यावेळी शाळेच्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त सुंदर नाट्य सादर केले. शाळेच्या वतीने सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
तसेच प्राचार्य गवळी यांनी शिक्षकांबद्दल तसेच विद्यार्थांबद्दल एकमेकांशी कसे नाते असावे, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात कशी आपुलकी असते हे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षा शितोळे व पल्लवी काळभोर यांनी केले. तर अश्विनी शिंदे यांनी आभार मानले.