नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित पीएच.डी. प्रवेश पूर्व पेट-२०२४ परीक्षा २८ डिसेंबर रोजी स. ११:०० ते दु. २:०० वा. या दरम्यान घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यातून जवळपास ५१२२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षेचे विद्यापीठ परीक्षेतील तीन जिल्ह्यांमध्ये आयोजन करण्यात आले आहे. पेट-२०२४ परीक्षा नांदेड शहरातील आठ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत.
त्यामध्ये पीपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज, नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेज, प्रतिभा निकेतन महाविद्यालय, वसंतराव नाईक कॉलेज, नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज, आयटीएम कॉलेज आणि एमजीएम कॉलेज या महाविद्यालयाचा समावेश आहे. लातूर मधून दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स या महाविद्यालयामध्ये परीक्षा केंद्र दिलेले आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील महाविद्यालयासाठी पेट-२०२४ परीक्षेचे आयोजन परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये करण्यात आलेले आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. तरी ज्या महाविद्यालयांना परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहेत. त्या महाविद्यालयातील प्राचार्यानी सदर पेट-२०२४ परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र-संचालक हुशारसिंह साबळे यांनी केले आहे.