उरुळी कांचन, (पुणे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीची लेखी परीक्षा मंगळवारी (ता. २१) सुरू झाली आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज व उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय येथे विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
पहिला पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्राचार्य भरत भोसले, केंद्र संचालक धनाजी ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देवून परीक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एकूण ९७१ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित असल्याची माहिती केंद्र संचालक धनाजी ठाकरे यांनी दिली.
डॉ. अस्मिता ज्युनियर कॉलेज उरुळी कांचन, न्यू इंग्लिश स्कूल खामगाव (ता. दौंड), पंचक्रोशी तांत्रिक विद्यालय वाघापूर व महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज या महाविद्यालयातील एकूण ९७१ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित आहेत. यामध्ये परीक्षा केंद्रावर विज्ञान शाखेतील ४१८, वाणिज्य शाखेतील २७४, कला शाखेतील १४८, तर किमान कौशल्य या शाखेचे १८१, असे एकूण ९७१ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित असल्याची माहिती केंद्र संचालक धनाजी ठाकरे यांनी दिली.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्राचार्य सीताराम गवळी यांनी स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देवून परीक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्राचार्य सीताराम गवळी यांनी दिल्या.
पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या परीक्षा केंद्रात पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे ४५९ विद्यार्थी, चिंतामणी विद्यालय थेऊर येथील ४०, एमआयटी येथील १६४, तर एंजेल हायस्कूलचे ९९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्य या शाखेचे ५७ विद्यार्थी असे एकूण ७६२ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. यामध्ये कला शाखेचे २४५, वाणिज्य शाखेचे १६१, विज्ञान शाखेचे २९९, तर किमान कौशल्य या शाखेचे ५७ विद्यार्थी असे एकूण ७६२ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित असल्याची माहिती केंद्र संचालक अर्जुन कचरे यांनी दिली.
दरम्यान, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत करण्यात आली आहे. तसेच भरारी पथके, मंडळ सदस्य, शासकीय अधिकारी यांच्या आकस्मित भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील परीक्षा केंद्रावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.