दीपक खिलारे
इंदापूर : विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये विविध क्षेत्रामध्ये मोठे होऊन आपल्या गावाचा व विद्यालयाचा नवलौकिक वाढवावा, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
बावडा (ता. इंदापूर) येथील श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘शिवहर्ष’ हा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव शनिवारी उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.
ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी संस्था कटिबद्ध आहे. शालेय जीवनातील स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असल्याने स्नेहसंमेलने आवश्यक असल्याचे प्रतिपादन हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात केले.
जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन अंगी बाळगावा, त्यामुळे आयुष्यभर यश नक्कीच मिळते. शिक्षण हे प्रगतीचे साधन आहे, असे नमूद करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी शुभेच्छा दिल्या.
या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी नृत्य, लावणी, थीम साँग, किर्तन, देशभक्ती गीते, भक्ती गीते, सैनिक गीत आदी नृत्ये सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.
या कार्यक्रमास नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, दत्तात्रय शिर्के, महादेव घाडगे, विकास पाटील, सुरेश मेहेर, सुधीर पाटील, लक्ष्मण आसबे, प्रसाद पाटील, स्वप्निल घोगरे, संजय घोगरे, संतोष सूर्यवंशी, विठ्ठल घोगरे, उपसरपंच निलेश घोगरे, अमोल घोगरे तसेच पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, बारामती विभाग निर्भया पथकाच्या प्रमुख अमृता भोईटे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक उदयसिंह पाटील, सचिव व सरपंच किरण पाटील, खजिनदार राजेंद्र सूर्यवंशी व संचालक मंडळाने मान्यवरांचे स्वागत केले. तसेच सूत्रसंचलन एस. टी. मुलाणी व अमर निलाखे यांनी केले. आभार प्राचार्य डी. आर. घोगरे यांनी मानले.