संतोष पवार
इंदापूर : माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती शिक्षण विभाग इंदापूर व डॉ .कदम गुरुकुल इंदापूर आणि तालुका मुख्याध्यापक संघ व विज्ञान अध्यापक संघ इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ व १३ डिसेंबर २०२४ रोजी ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन इंदापूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी आमदार भरणे यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.आमदार भरणे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. सातत्यपूर्ण अभ्यास आणि कष्ट केल्यास निश्चितपणे विद्यार्थी यश मिळवु शकतो. निश्चितपणे इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्याचे विज्ञान प्रदर्शनातील प्रयोग राज्यात प्रथम क्रमांकावर राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये इंदापूर तालुक्यातील शाळांचे 130 हुन अधिक विज्ञान प्रयोग मांडण्यात आले आहेत. विज्ञानप्रदर्शन उद्घाटन प्रसंगी बोलताना इंदापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांनी विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य उद्देश हेतू विद्यार्थ्यांना सांगितला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी त्यातून भविष्यातील शास्त्रज्ञ बनावे तसेच भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बजवावी. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वांना चालना मिळावी, त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना यांना वाव मिळण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची मुख्य थीम ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान -तंत्रज्ञान’ अशी असुन त्यावर आधारित कचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा, आधुनिक शेती, सायबर सुरक्षा आदि विषयांवर प्रयोग सादर करण्यात आले आहेत. दरम्यान या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी तालुक्यातील विविध शाळांचे विद्यार्थी पालकवर्ग शिक्षक यांनी भेट दिली. दिनांक 13 डिसेंबर रोजी विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दरम्यान याप्रसंगी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात, डॉ कदम गुरकुलचे डॉ लहू कदम व डॉ सविता कदम ,डॉ विवेक कदम, सचिव नंदकुमार यादव, डॉ कदम गुरुकुलच्या मुख्याध्यापिका माधुरी गोखले, डॉ कदम जीवन विकास प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या अनिता पराडकर, इंदापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, इंदापूर विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष काळेसर आदिंसह तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर विद्यार्थी पालक उपस्थित होते.