लोणी काळभोर : सोशल मीडियाचे व्यसन ही एक धोक्याची घंटा आहे. विद्यार्थी हा मोबाईलचा अतिरिक्त व अनावश्यक वापर करीत आहे. त्याने शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी ”डिजिटल डिटॉक्स ड्राईव्ह” पाळावा. असे आवाहन लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर यांनी केले आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या ‘इंग्लिशू मिडीयम स्कूल’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ”डिजिटल डिटॉक्स ड्राईव्ह” या कार्यक्रमाचे आज गुरुवारी (ता.२०) आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरील आवाहन सरपंच माधुरी काळभोर यांनी केले आहे.
यावेळी उपसरपंच भारती काळभोर, राष्ट्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक कमलेश काळभोर, संस्थेचे पुणे विभाग प्रमुख प्राचार्य एस. एम. गवळी, मुख्याध्यापिका पोर्णिमा शेवाळे, राष्ट्रसेवा संघाच्या शुभांगी फलटणकर, भाग्यश्री भिकोले, प्रियांका ढम, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच माधुरी काळभोर म्हणाल्या, दैनंदिन जीवन जगत असताना, सर्व विद्यार्थी व नागरिकांनी जास्तीत जास्त वेळ हा एकमेकांशी संवाद साधून केला पाहिजे, दररोज व्यायाम केला पाहिजे, जास्तीत जास्त पुस्तकाचे वाचन करून आपल्या जवळील शब्द संपत्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तरच आपल्या ज्ञानात भर पडेल. व आपण विविध अडचणींना सामोरे जावून त्यावर मात मिळवू शकतो. यामुळे मोबाईलचा होणारा अतिरिक्त वापर टाळता येईल.
दररोज कमीत-कमी दोन तास तरी आपल्या घरातील सर्व मोबाईल्स, टी.व्ही. किंवा इतर मनोरंजनाची साधने बंद करून आपण आपल्या मुलांना अभ्यासासाठी बसवावे. त्यांच्यामधील सप्त कलागुणांमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने एकमेकांश संवाद साधावा. मोबाईल खेळण्याऐवजी मुलांना मैदानी व पारंपारिक खेळाचे महत्त्व पटवून द्यावे. तसेच विद्यार्थ्यांनी घरातील कामांमध्ये आपल्या आई-वडिलांना मदत करावी. असे आवाहन सरपंच माधुरी काळभोर यांनी यावेळी केले आहे.
यावेळी बोलताना कमलेश काळभोर म्हणाले, लोणी काळभोर मधील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आजपासून दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक उपकरण बंद ठेवावीत. व रोज सायंकाळी दोन तास डिजिटल डिटॉक्स पाळावा. तसेच यावेळेत पालकांनी मुलांना अभ्यासात मदत करावी.
दरम्यान, लोणी काळभोर ग्रामपंचायत, राष्ट्रसेवा संघ व ‘इंग्लिशू मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ”डिजिटल डिटॉक्स ड्राईव्ह” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तर दिपावलीच्या सर्वांना शुभेच्छा देवून कार्यक्रमाचे आभार शाळेच्या सुपरवायझर व्ही. ए. शिंदे यांनी मानले.
डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय?
सोशल मीडिया हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे आणि आपण या प्लॅटफॉर्मवर विनाकारण आपला वेळ वाया घालवत असतो. काही काम नसले की फोन घेऊन पडून राहतो आणि सतत सोशल मीडिया चाळत बसतो. रोजरोज हेच काम केले, की याची सवय लागते. ही सवय मोडण्यासाठी फोनपासून लांब राहणे किंवा फोन दूर ठेवणे आणि सोशल मीडिया अॅप्सचा वापर कमी करणे, याला डिजिटल डिटॉक्स म्हणतात.