दीपक खिलारे
इंदापूर : शहा (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आठवडे बाजार भरविला होता. भाजी घ्या, भाजी ताजीताजी भाजी, असा चिमुकल्यांच्या आवाजामुळे शाळेत बाजाराची वातावरणनिर्मिती झाली होती.
शहा परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या शेतातील भाजीपाला तालुक्याच्या बाजारात न पाठवता थेट शाळेत भरवलेल्या बाजारात विकायला आणला होता.
या पालेभाज्या सह बाजारात भजी, वडापाव, चहा, किराणा माल आणि महिलांसाठी सौंदर्यप्रसाधने आदींची दुकाने थाटण्यात आली होती. या आठवडे बाजारात गावातील नागरीकांनी मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शंकर कचरे म्हणाले की, मुलांना फक्त शालेय ज्ञान देण्यापेक्षा सभोवतालच्या समाज आणि व्यवहार ज्ञानाची माहिती व्हावी आणि अशा उपक्रमातून मुलांना गणित,विज्ञान या विषयांत शिकताना गोडी निर्माण व्हावी यासाठी हा अभिनव उपक्रम शाळेच्या वतीने भरवण्यात आला आहे. उपक्रमास दिलेल्या प्रतिसादाबद्दल गावकऱ्यांचे आभारही त्यांनी मानले.
शहा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दिलीप पाटील, शिवाजी शिंदे, तानाजी गंगावणे, अशोक पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन निकम, किशोर धाईंजे, सुरज धाईंजे , दत्तात्रय पाटील, शरद भोई, संतोष पाटील, राहुल सूर्यवंशी, महादेव लांडगे, मोहन गंगावणे, दादा जाधव, सूर्यभान निकम यांच्यासह गावातील महिला तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रामचंद्र कांबळे, परमेश्वर खंदारे, जाई कोळेकर, गणेश मोरे यावेळी उपस्थित होते.