विशाल कदम
लोणी काळभोर, ता.०३ : राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मंगळवारी (ता.३) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याबाबतची माहिती विद्यालयाच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे यांनी दिली.
विद्यालयात सर्वात प्रथम महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पुणे विभागप्रमुख प्राचार्य सीताराम गवळी, इन्चार्ज सुलताना इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्या पौर्णिमा शेवाळे म्हणाल्या की, ‘अच्छा देखो, अच्छा बोलो, अच्छा सुनो’ गांधीजींच्या या तीन गोष्टी विद्यार्थ्यांनी अंगिकाराव्यात. तसेच शास्त्रीजींच्या साधेपणा, निःस्पृहपणा, निर्मोही व्यक्तिमत्वाचा बोध घेऊन विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे आचरण करावे’, असा संदेश शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
गांधी जयंतीनिमित्त लहान गटातील मुलांनी गांधींची वेषभूषा परिधान केली होती. जयंतीनिमित्त इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्यानंतर शाळेमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानामध्ये लहान गट ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होता.
यावेळी शाळेच्या शिक्षिका गेयती टिळेकर, हर्षा शितोळे, शाहीन शेख, प्रियंका काळभोर, प्रिया बंडगर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती कदम यांनी केले तर आभार अंजली कवडे यांनी मानले.