लोणी काळभोर, (पुणे) : परीक्षा म्हटले की तणावाचे वातावरण असते. या वातावरणाचे आनंदात रूपांतर व्हावे म्हणून पूर्व हवेलीतील लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील महाविद्यालयातील दहावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छांबरोबरच गुलाबाची फुले देऊन स्वागत करण्यात आले.
शालेय जीवनात महत्वाचा टप्पा म्हणून दहावीच्या परीक्षेकडे पाहीले जाते. त्यामुळे पहिला पेपर कसा जाईल, प्रश्नपत्रिकेत नेमके काय विचारले जाईल, सर्व प्रश्न वेळेत सोडवता येतील का…? असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात घर करून राहतात. यातून तणावाची स्थिती उद्भवते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तणाव जाणवतो. हीच काळजी बऱ्याच पालकांनाही असते.
पहिला पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. त्यामुळे ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्राच्या आवारात गुरुवारी (ता. ०२) पालकांची गर्दीही पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे म्हणून लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील शाळांनी मुलांना गुलाबाची फुले देऊन त्यांचे शाळेत स्वागत केले. तर उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात ध्वनीक्षेपकावरून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जात होत्या.
लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल या केंद्रावर एकूण ६१९ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित असल्याची माहिती केंद्रसंचालक अन्सार पिरजादे यांनी दिली. प्राचार्य सीताराम गवळी, कन्या प्रशालेच्या मुख्यध्यापिका झिंजुरके एन. पालक व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देवून परीक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. या केंद्रावर पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल, कन्या प्रशाला, पृथ्वीराज कपूर इंग्लिश मिडीयम स्कूल लोणी काळभोर व सेंट टेरेसा या विद्यालयातील एकूण ६१९ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित आहेत.
उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय या केंद्रावर परिसरातील ११ शाळांचे एकूण १ हजार ३३५ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित असल्याची माहिती केंद्रसंचालक शेखर शिंदे यांनी दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य भरत भोसले, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे खजिनदार राजाराम कांचन, उपप्राचार्य कोकाटे सर व सर्व पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील केंद्रावर महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन, अमर एज्युकेशन इंस्टीट्युट कोरेगाव मूळ, एंजल हायस्कूल उरुळी कांचन, लोकनेते दादा जाधवराव माध्यमिक विद्यालय हिंगणगाव, न्यू इंग्लिश स्कूल आष्टापूर, पुरोगामी माध्यमिक विद्यालय सोरतापवाडी, संत यादवबाबा माध्यमिक विद्यालय शिंदवणे, शिवराम बापू कुदळे माध्यामिक विद्यालय, बोरिऐंदी, ता. दौंड, सुभाषआण्णा कुल माध्यमिक विद्यालय बोरीभडक, ता. दौंड, स्वामी विवेकानंद हायस्कूल उरुळी कांचन, विद्या विकास मंदिर, यवत, ता. दौंड, या विद्यालयातील एकूण १ हजार ३३५ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित असल्याची माहिती प्राचार्य भारत भोसले यांनी दिली.
दरम्यान, या वेळी परीक्षादरम्यान कॉपीचे प्रकार होऊ नये म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पृथ्वीराज कपूर महाविद्यालय व उरुळी कांचन येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.