सागर जगदाळे
भिगवण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेला आजपासून (दि.२१) सुरुवात झाली. येथील क्षीरसागर ज्युनिअर कॉलेजच्या परिक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व मिठाई देऊन उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.
क्षीरसागर विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एकूण ५७० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले असून यामध्ये क्षीरसागर विद्यालयाचे विद्यार्थी तसेच जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय पारवडी,(ता.बारामती),त्रिमूर्ती विद्यालय टाकळी(ता. करमाळा), ग.दा.सप्तर्षी उच्च माध्यमिक विद्यालय खेड(ता. कर्जत) आणि सरस्वती विद्यालय रावणगाव (ता.दौंड) या विद्यालयामधील परीक्षार्थी परीक्षेसाठी बसलेले आहेत.
परीक्षेच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये किंवा गैरप्रकार होऊ नये याकरिता विद्यालयामध्ये बैठे पथकाचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.
कॉपीमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा देण्याकरिता सर्व नियोजन केल्याचे यावेळी प्राचार्य तुषार क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष अजित क्षीरसागर,सचिव प्रसाद क्षीरसागर, नवनाथ सावंत, मोहन काळे, पराग चौधरी, अविनाश गायकवाड, सुमन मकवाना, विराज देवकते व सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.