पुणे: इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा जुलै महिन्यात होणार असून, यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्जनोंदणी करण्यासाठी नियमित शुल्काद्वारे शुक्रवार, ३१ मे ते ११ जून या कालावधीत मुदत देण्यात आली आहे. तसेच विलंब शुल्काद्वारे विद्यार्थी १२ ते १७ जून या कालावधीत अर्ज करू शकतात.
दहावीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी पुरवणी परीक्षा घेतली जाते. याकरिता ऑनलाइन अर्जनोंदणी करणे आवश्यक आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी तसेंच श्रेणीसुधार योजनेतील विद्यार्थी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. यासाठी मंडळाकडून काही सूचना करण्यात आल्या आहेत.
यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन अर्ज भरताना मार्च २०२४ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइन घेता येईल, श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या मार्च २०२४ परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै २०२४ व मार्च २०२५ अशा दोन लगतच्या संधी उपलब्ध राहतील. नियमित, विलंब शुल्कासह अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारेच भरण्यात यावे. सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शांळांनी निर्धारित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करून चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात आणि ऑनलाइन अर्ज करण्याच्या तारखेत कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नाही, अशा सूचना मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.