पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.
नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे अर्ज सरल डेटाबेसवरून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत भरायचे आहेत. तर पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केलेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयचे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज हे संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारताना सरल डेटाबेसमध्ये संबंधित विद्यार्थ्यांची नोंद असल्याची पडताळणी करावी. याव्यतिरिक्त अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी निश्चित केलेल्या तारखांना 1 अर्ज करावेत, अशा सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिल्या आहेत