पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागातर्फे महाराष्ट्र व गोव्यातील उमेदवारांसाठी ७ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका setexam. unipune.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांना येत्या ९ मेपर्यंत सूचना व तक्रारी सादर करता येणार आहेत. विद्यापीठातर्फे याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
विद्यापीठातर्फे एकूण १७ शहरांतील २८९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर आता परीक्षेच्या प्राथमिक उत्तरतालिकेबाबत तक्रारी स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच दिलेल्या सूचनेप्रमाणे प्राथमिक उत्तरतालिकेबाबत काही सूचना किंवा तक्रार असल्यास ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या शुल्कासह अर्ज करावेत.
तसेच अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने जमा करायचे असून व्यक्तिशः किंवा टपालामार्फत स्वीकारले जाणार नाहीत. विद्यापीठातर्फे उत्तरतालिकेची लिंक ९ मे रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे, असे विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.