मुंबई: राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा त्यानंतर भरवण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत प्रोत्साहनात्मक योजनाचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात 5 डिसेंबर 2023 रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषणादरम्यान राज्यपाल यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक आणि प्रशासनातील अधिकारी यांचे अभिप्राय देखील यामार्फत नोंदवण्यात आले. यामध्ये काही बाबी शिक्षण विभागाच्या समोर आल्या आहेत.
राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खासजी शाळा भरण्याच्या वेळा या सकाळी सातनंतर आहेत. आधुनिक युगातील बदलेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेले ध्वनिप्रदूषण अशा विविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत. सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे.
या परिस्थितीचा विचार करता सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्मयांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याच्या वेळेमध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे राज्य सरकारने परिपत्रकात नमूद केले आहे.
तसेच शाळेच्या वेळेत बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घेण्याच्या सूचना सरकारेन केल्या आहेत. तसचं, ज्या शाळेच्या व्यवस्थापनाच्या आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल तर त्यांच्या अडचणी त्यांनी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरिक्षक यांच्याकडे सोपवावी, असे देखील राज्य सरकारच्या आदेशात म्हटले आहे.