पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेश परीक्षा २०२४ (पेट) सुरळीतपणे झाली. ही परीक्षा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पुणे, अहमदनगर व नाशिकच्या १८ केंद्रावर घेण्यात आली. ४० विषयासाठी घेतलेल्या परीक्षेसाठी १० हजार ७०० परीक्षार्थीनी अर्ज केले होते. त्यापैकी ९ हजार १२८ परीक्षार्थीनी उपस्थित राहून पेटची परीक्षा दिली.
पेट परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया १० जुलैपासून सुरू केली होती. २४ ऑगस्ट रोजी परीक्षेचे आयोजन केले होते. परंतु, विविध प्रसारमाध्यमे व वृत्तवाहिन्यांवर महाराष्ट्र बंद संदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे आणि विद्यार्थी व विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास विलंब किंवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे ३१ ऑगस्ट रोजी पेट परीक्षेचे आयोजन केले होते. त्यानुसार पेट परीक्षा सुरळीतपणे पार पडली असून, १२ सप्टेंबरपर्यंत निकाल घोषित करण्यात येईल, असे शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी सांगितले.