विशाल कदम
लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील समर्थ विटकर याने जिल्हास्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. समर्थने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.
लायन्स कलब ऑफ पुणे फोर्ट डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ आयोजित ४४ वी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा सदाशिव पेठ (पुणे) येथील उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील ७२ मुलांनी सहभाग घेतला. समर्थने यापूर्वीही लायन्स क्लबच्या वक्तृत्व स्पर्धेत दोन वेळा पारितोषिक मिळविले आहे. तसेच त्याने उरुळी कांचन येथील विकास प्रतिष्ठानचे सलग तीन वेळा प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
दरम्यान, समर्थ विटकरला वक्तृत्व स्पर्धेसाठी मुख्याध्यापक चेतन सोनवणे, वडील सोमनाथ विटकर व आई अर्चना विटकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल उरुळी कांचनसह लोणी काळभोर व परिसरातील नागरिक व नातेवाईकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
समर्थ सोमनाथ विटकर हा उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एंजल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक चेतन सोनवणे यांनी समर्थला चषक व बक्षीस देऊन सन्मानित केले. तसेच त्यांनी समर्थला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.