पुणे: शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचा तिढा न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर सुटला असून, सोडतीतून शाळा मिळालेल्या पालकांना सोमवार, २२ जुलैपासून एसएमएस पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. सोडतीची निवड यादी व प्रतीक्षा यादी शनिवारी आरटीईच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. २३ जुलै ते ३१ जुलैया कालावधीत पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत.
आरटीई प्रवेशासंदर्भात न्यायालयाने शुक्रवारी निकाल जाहीर केला. सर्व विनाअनुदानित आणि खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेश देण्यात यावेत, असे आदेश या निकालाद्वारे देण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी २५ टक्के जागांवर प्रवेश दिलेल्या खासगी शाळांमध्ये पुन्हा प्रवेश देण्याचे न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे. शिक्षण विभागाकडून ७ जून रोजी सोडत काढण्यात आली होती. गोसावी म्हणाले, प्रवेश दिलेल्या खासगी शाळांमध्ये पुन्हा प्रवेशप्रक्रिया राबवा, असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. पालकांना सोमवारपासून एसएमएस पाठवण्यात येतील. तसेच निवड यादी व प्रतीक्षा यादी शनिवारी जाहीर होणार आहे. २३ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश घ्यावा.