पुणे : इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या तिसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, या फेरीत ३ हजार ८५५ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे. यांपैकी २ हजार ९५३ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाले आहे. अकरावीच्या दोन विशेष फेऱ्या संपल्या असून, रिक्त जागांसाठी तिसरी फेरी राबविण्यात येत आहे. एकूण ३९ हजार ६४७ इतके विद्यार्थी तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले. यांपैकी ३ हजार ८५५ विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार महाविद्यालय देण्यात आले. कला शाखेत २५८ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार महाविद्यालय मिळाले आहे. वाणिज्य शाखेत १ हजार १७५ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले. विज्ञान शाखेत १ हजार ४३९ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले. तर, व्यावसायिक शिक्षण शाखेत ८१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे.
प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना आज (दि. २३) सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा. ज्या विद्यार्थ्याला मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर त्या विद्याथ्याने लॉगिनमध्ये ‘प्रोसिड फॉर ऍडमिशन’ वर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. या फेरीनंतरही काही विद्यार्थी प्रवेश घेऊ शकले नाहीत, त्यांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
आतापर्यंत ९०२ विद्यार्थ्यांना पसंतीक्रम देऊनही महाविद्यालय मिळालेले नाही. तरी विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम देताना रिक्त जागांचा तपशील व कनिष्ठ महाविद्यालयाचे कटऑफ बघून आपले पसंतीक्रम नोंदवावे, अशी माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सदस्य सचिव डॉ. ज्योती परिहार यांनी दिली.